'कालाय तस्मै नमः' असं नेहमीच म्हटले जाते. ज्या समस्येवर उत्तर सापडत नाही त्यावर काळाचे औषध बरोबर लागू पडते. ज्या विषयावर निर्णय घेता येत नाही तो विषय प्रलंबित ठेवला की काळच त्यावर उत्तर शोधून देतो. जीवनातील सर्व प्रांतात स्पर्धा ठासून भरलेली असली तरी त्यामध्ये काही रिकाम्या जागा म्हणजे संधी या काळाच्या परिवर्तनाच्या मुलभूत नियमानुसार निर्माण होत असतात. या निर्माण झालेल्या संधी म्हणजे अनेकदा प्रलंबित समस्येवर काळाने शोधलेले उत्तर असते. या प्रलंबित संधी साधताना थोडा उशीर जरी झाला तरी निराश न होता तसेच न डगमगता निर्णय घेणे आवश्यक व अधिक महत्वाचे असते. 'ती' माझा दरवाजा अजूनही वाजवत होती परंतु मी मात्र घरपोच पुस्तक सेवा परवडेल की नाही या द्विधा मनस्थितीत अडकून निर्णय घ्यायला विलंब करीत होतो. परंतु काळ नावाच्या औषधानेच माझी ही समस्या सोडवली होती. संधी साधायला अधिक उशीर करू नका अशी जेव्हा हितचिंतकांनी जाणीव करून दिली तेव्हा मी सावध झालो व तात्काळ प्रयत्नांचा दरवाजा उघडला. उशीर इतका सुद्धा झाला नव्हता की संधीचे सोने करणे अशक्य होते. अजूनही नियती मला प्रगती पथावर पुढे पुढे जाण्यास मदत करीतच होती.
वाचनालय व्यवसायाच्या वृद्धीसाठी नवीन मार्ग चोखाळणे आवश्यक होते. महाजालावरील संकेतस्थळाद्वारे घरपोच पुस्तक सेवा देणे हा नविन विचार घेऊन नागेंद्र आणि साईनाथ माझ्याकडे आले होते. घरपोच पुस्तक सेवा हा अपारंपारिक पर्याय आपल्याला कितपत परवडेल याबाबत मी कमालीचा साशंक झालो होतो. ज्या विषयावर निर्णय घेता येत नाही त्याला काळ हे औषध लागू पडते असा विचार करून मी तो विषय प्रलंबित ठेवला होता. सदर विषय माझ्या विस्मरणात गेला असला तरी तो मी सोडून दिला नव्हता. नागेंद्र व साईनाथ हे मला भेटून आता जवळपास सहा महिन्याचा कालावधी लोटला होता. सन २००८ चा एप्रिल महिना होता. एक दिवस मला साईनाथ यांचा दूरध्वनी आला. ''मामाजी इस महिने का 'डिजीटल मॅक्झिन' (Digital Magazine) देखा क्या?'', मी विचारले ''काय आहे त्यात?'' त्यांनी डिजीटल मासिकातील एक विशिष्ट क्रमांकाचे पान वाचायला सांगितले. मी डिजीटल मासिक आपल्या वाचनालयासाठी नियमितपणे मागवायचो. साईनाथने सांगितल्याप्रमाणे मासिकातील ते पान उघडून वाचायला सुरुवात केली आणि मी एकदम सावध व सतर्क झालो. संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) घरपोच पुस्तक सेवा देण्याची जी योजना सहा महिन्यापुर्वी आम्ही आखत होतो तीच योजना 'लायब्ररीवाला डॉट कॉम' (www.librarywala.com) या संकेतस्थळाद्वारे काही दिवसांपुर्वी मुंबईत सुरू झाली होती. डिजिटल मासिकात त्याबद्दलची संपूर्ण माहिती छापून आली होती. मुंबईच्या वडाळा येथील संगणक तंत्रज्ञान शिकलेल्या सात तरुणांनी ही कंपनी सुरू करून पुस्तकांच्या घरपोच सेवेला प्रारंभ केला होता. माझ्याकडे २१ वर्षांचा वाचनालय व्यवसायाचा अनुभव होता. डोंबिवलीत पै फ्रेंड्स लायब्ररीचे नावं सर्वश्रुत झाले होते. साईनाथ आणि नागेंद्र यांनी मला सहा महिने आधीच संकेतस्थळाद्वारे घरपोच पुस्तक सेवा देण्याचे सुचविले होते. परंतु मी पुढाकार घेऊन कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सदर योजना प्रत्यक्षात चालू झाली नव्हती. कोणताही निर्णय न घेणे हा सुद्धा एक निर्णयच असतो व त्याचे परिणाम सुद्धा आपल्या वाट्याला येतच असतात. काळाने मला माझ्या समस्येवर उत्तर शोधून दिले होते. डिजिटल मासिकातील ती बातमी माझ्यासाठी उत्तरच होते. ती बातमी मी वाचली आणि ताबडतोब नागेंद्रला बोलावून घेतले. त्याला लगेचच पुढच्या कामाला सुरुवात करायला सांगितले.
संकेतस्थळ (वेबसाईट) सुरू करणे सोपी गोष्ट नव्हती. मुख्य म्हणजे त्यासाठी भरपुर भांडवल लागणार होते. यावर तोडगा काढण्यासाठी सन २००८च्या मे महिन्यामध्ये मी, नागेंद्र व साईनाथ अशी आमची तिघांची पहिली बैठक (मीटिंग) झाली. तिघांनी प्रत्येकी एक लाख रुपये या व्यवसायात गुंतवायचे असं चर्चेअंती ठरले. इतर तदानुषंगिक मुद्यांवर सुद्धा त्या बैठकीत चर्चा झाली. संकेतस्थळ बनवणे हा माझा विषय नव्हता त्यामुळे त्याची जवाबदारी साईनाथ यांनी घेतली होती. त्यांनी संकेतस्थळ बनविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मागवून घेतला. संकेतस्थळ बनवण्यासाठी साईनाथ यांचा भाऊ अविनाश व अविनाशचा मित्र अश्या दोघांची नियुक्ती करण्यात आली. ते दोघे नोकरी करून संध्याकाळी घरी आल्यावर संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम करणार असल्याने त्यांना त्या कामासाठी चार महिन्याएवढा कालावधी लागणार होता. एकदा का संकेतस्थळ तयार झाले की मग अंदाजे ऑक्टोबर महीन्यामध्ये एखाद्या दिवशी घरपोच पुस्तक सेवेला प्रारंभ करायचा असं ठरले.
वाचनालयाच्या या अपारंपारिक, नविन प्रकारच्या व्यवसायिक उपक्रमाला 'पै फ्रेंड्स लायब्ररी ऑनलाईन' हे नाव द्यायचे असं तिघांच्या सहमतीने ठरले. वाचनालयाच्या या नवीन प्रकारच्या उपक्रमासाठी वेगळे बोधचिन्ह (लोगो) आवश्यक होते. चारपाच ओळखीच्या लोकांकडून बोधचिन्हाचे (लोगोचे) रेखाटन (डिझाईन) करवून घेतले. परंतु आम्हा तिघांना त्यापैकी कोणतेही बोधचिन्ह (डिझाईन) पसंद पडले नाही. शेवटी साईनाथच्या ओळखीने हे काम एका अमेरिकन कंपनीकडे सोपविण्यात आले. काही दिवसांतच त्या कंपनीने सात आठ निरनिराळी बोधचिन्हे (लोगो डिझाईन्स) तयार करून ई-मेलद्वारे आम्हाला पाठविली. त्यातील एका बोधचिन्हांमध्ये पै फ्रेंड्स लायब्ररीचे नावं, पृथ्वीचे निर्देशन करणारा एक छानसा वाटोळा गोल, त्या गोलात आम्ही तिघे भागीदार व पुस्तकांच्या चिन्हांचे रेखाटन केले होते. हे बोधचिन्ह आम्हाला परिपूर्ण वाटले कारण या बोधचिन्हातून आम्ही तिघे भागीदार, पुस्तके तसेच हा व्यवसाय जगात कुठेही सेवा देऊ शकतो हे अचूकपणे निर्देशित केले गेले होते. त्यामुळे आम्हा तिघांना ते बोधचिन्ह पसंद पडले. सदर बोधचिन्हांसाठी त्या अमेरिकन कंपनीला शंभर डॉलर इतकी घसघशीत रक्कम द्यावी लागली होती. सभासद संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करणार असल्याने बोधचिन्हाला व्यवसायिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते. जाहिरातीसाठी त्याचा सर्वाधिक उपयोग होणार होता.
संकेतस्थळाचे (वेबसाईटचे) काम साईनाथ पाहत होते. पुस्तकं निवडण्याची जवाबदारी माझ्याकडे होती. जाहीरात करणे, कुशल कर्मचारी नियुक्ती करणे व पुस्तक घरपोच पोहोचवणारी यंत्रणा सांभाळणे इत्यादी गोष्टींची जवाबदारी नागेंद्रकडे होती. नागेंद्र व साईनाथ दोघेही ई-बे (e-Bay) कंपनीत नोकरी करत असल्याने महिन्यातील केवळ एकाच रविवारी आम्हाला भेटता येत असे. अश्याप्रकारे दिवस सरत होते. सन २००८ चा ऑक्टोबर महिना आता जवळ आला होता. त्यामुळे आता दर रविवारी भेटायचे ठरले. काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार होते. घरपोच पुस्तक सेवा कोणत्या शहरातून सुरू करायची? या मुद्यावर सर्वात प्रथम आमच्यामध्ये चर्चा झाली. संपुर्ण मुंबई शहरात सदर सेवेला प्रारंभ करावा असे माझे मत होते. परंतु साईनाथ यासाठी तयार नव्हते. "सुरुवात आपल्या जवळ असलेल्या ठाणे व मुलुंड या मुंबईच्या उपनगरांतून करू या. त्यानंतर आपल्याला सदर सेवा देणे सर्वदृष्टीने परवडत आहे का ते आधी तपासू या" असं साईनाथ म्हणाले. ठाणे शहर खूप मोठे होते तर मुलुंडमध्ये मराठी भाषिक वाचक मोठ्या संख्येने रहात होते. अनेक वाचक डोंबिवलीहून ठाण्याला घोडबंदर रोड विभागात स्थलांतरीत झाले होते. मग तिघांच्या सहमतीने मुलुंड व ठाण्यापासून घरपोच पुस्तक सेवेला प्रारंभ करायचे ठरले.
दुसरा महत्त्वाचा मुद्धा म्हणजे सदर सेवेसाठी वर्गणी किती आकरायची? हा होता. मग यावर आमच्यामध्ये चर्चा झाली. सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत जे वाचक पुस्तकांची मागणी (ऑर्डर) नोंदवतील. त्यांच्याकडे संध्याकाळी पुस्तक पोहचवायचे असं ठरले. घरपोच पुस्तक सेवेमध्ये एका फेरीचा (डिलिव्हरीचा) खर्च अंदाजे शंभर रुपयापर्यंत येणार होता. एकाच परिसरात जास्त सभासद असतील तर खर्च कमी होण्याची शक्यता होती. सध्या तरी एकच ग्रंथवाहक कर्मचारी (डिलिव्हरी बॉय) ठेवायचे निश्चित केले. जसजसे सभासद वाढत जातील तसतसे अजून ग्रंथवाहक कर्मचारी नियुक्त करायचे असं ठरले. कार्यालयीन दैनंदिन खर्चापासून ते घरपोच फेरीपर्यंतच्या होणार्या सर्व खर्चांचा विचार केल्यावर मासिक वर्गणी रू. १५०/-, अनामत रक्कम ३००/- व प्रवेश शुल्क १००/- आकारायचे ठरले. एवढा आकार वाचकांना परवडेल का? लोक एवढे पैसे मोजून सभासद बनतील का? यावर आमची चर्चा झाली. सभासदांच्या आर्थिक क्षमतेचा सुद्धा विचार करणे आवश्यक होते म्हणून सुरुवातीला थोडे नुकसान झाले तरी चालेल परंतु कमीत कमी वर्गणीमध्ये उत्तम सेवा देण्याचे ठरले.
आपल्या वाचनालयाच्या रामनगर शाखेच्या आतील जागेमध्ये ऑनलाईन सेवेच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजांसाठी एक छोटासा कार्यकक्ष (ऑफिस) बनवून घेतला. दोन संगणक, एक मेज (टेबल) व अनुक्रमांकानुसार ओळीत असलेले तीन दूरध्वनी क्रमांक खरेदी केले. सुमारे एक हजार पुस्तके मावतील असे कपाट बनवून घेतले. आज्ञावलीचे (सॉफ्टवेअरचे) काम आता संपत आले होते. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी नवीन उपक्रमाची सुरुवात करायची होती. एक दिवस आधी पुस्तकं संकेतस्थळावर अग्रेषित (लोड) करायला सुरुवात केली. सुरुवातीला पुस्तकं संकेतस्थळवर व्यवस्थित दिसत होती. संध्याकाळी काहीतरी समस्या निर्माण झाली आणि पुस्तकं संकेतस्थळावरून दिसेनाशी झाली. प्रथमाग्रासे मक्षिकापात झाला होता. उद्या पूजा करून संकेतस्थळाचा व नव्या उपक्रमाचा शुभारंभ करायचे निश्चित झाले होते आणि आज अचानक ही समस्या उद्-भवल्याने मी कमालीचा नाराज झालो. कसेही करून सकाळपर्यंत पुस्तकं संकेतस्थळावर दिसलीच पाहिजे असे मी साईनाथ आणि नागेंद्रला बजावून सांगितले. मध्येच माशी कुठे शिंकली हे न समजल्याने ते दोघे सुद्धा चांगलेच अस्वस्थ झाले होते. माझी संतप्त नाराजी पाहून नागेंद्र, साईनाथ, त्यांचा भाऊ अविनाश व अविनाशचा मित्र या चौघांनी रात्रभर जागून सर्व पुस्तकं परत स्कॅन करून पहाटे सात वाजेपर्यंत जवळपास ८०० पुस्तकं संकेतस्थळावर पुन्हा अग्रेषित (लोड) केली होती. सकाळी मी जेव्हा संकेतस्थळाची तपासणी केली तेव्हा सर्व पुस्तकं परत व्यवस्थित दिसत होती. मला खूप हायसे वाटले. संकेतस्थळाद्वारे घरपोच पुस्तक सेवा या उपक्रमाला सुरूवात झाल्यानंतर काही विघ्न आले असते तर मला अधिक मनःस्ताप झाला असता व इतर व्यवसायिक समस्यांना तोंड द्यावे लागले असते हे लक्षात घेऊन नियतीने ते विघ्न अगोदरच दूर केले होते. नियती अजूनही मला साथ देत प्रगती पथावर पुढे पुढे नेत होती त्याची ही खूणगाठ होती. त्याच सायंकाळी घरातील काही मंडळी तसेच माझ्या काही मित्रांना बोलावून मनोभावे यथासांग पूजा केली. 'कालाय तस्मै नमः' करीत दिनांक २९ ऑक्टोबर २००८ रोजी पै फ्रेंड्स लायब्ररीच्या संकेतस्थळाद्वारे ठाणे व मुलुंड परिसरात घरपोच पुस्तक सेवा देण्याच्या अपारंपारिक नवीन उपक्रमाचा शुभारंभ केला.....