Friday, March 27, 2020

कुंदापूरची जत्रा आणि बॉम्बे टू गोवा

माझं नाव पुंडलिक असलं तरी माझ्या घरी मला 'पुंडा' नावाने हाक मारतात. त्यामुळे माझ्या जवळचे सर्व मित्र मला 'पुंडा'च म्हणतात. बाकी काही लोकं पुंडलिक, पुंडलिका म्हणतात असो. आमचं आडनाव पै, असं एकेरी आडनाव खूप कमी लोकांचं आहे, पण या आडनावामुळे खूपजण चिडवतात. जसं 'पै फॉर पैसा', कन्नडमध्ये पै गुद्धी पावणे म्हणजे 'पै पै किती जमवले', वगैरे.

आम्ही पै, म्हणजे GSB गौड सारस्वत ब्राह्मण. पण मी मस्करीत गरीब सारस्वत ब्राह्मण म्हणत असतो!! तसं आम्ही गरीबीतूनच दिवस काढले. वडील होते तोपर्यंत ठीक होतं, वडील मी पहिलीत असतानाच वारले, मोठे भाऊ ज्यांना आम्ही आण्णा म्हणतो ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले.  सुरुवातीला हॉटेलमध्ये कामाला लागले. महिन्यातून मिळालेल्या पगारातून १० रुपये मनी ऑर्डरने आम्हाला पाठवायचे, या पैशातून २० किलो तांदूळ आणायचो. त्याकाळात तांदूळ गवताच्या गोलाकार वस्तूमध्ये यायचे. आम्ही त्याला 'मुठो' म्हणायचो. तेवढा तांदूळ एक महिना पुरायचा. सकाळची पेज असायची त्याच्याबरोबर घरचं लोणचं, दुपारी जेवण. घरचाच नारळ असल्यामुळे आणि भाजी लोकं आणून द्यायचे किंवा रविवारच्या बाजारातून त्यामुळे पोट भरून जेवण. आमची आई जेवण खूप चांगलं बनवायची. आताच्या जेवणाला तेवढी चव नाही. कदाचित भुकेमुळे असू शकेल. दिवसभर मस्ती करून थकून जायचो आणि चॉईस नव्हता. फक्त सणासुदीला वेगवेगळे पक्वान्न असायचे. फणसाचे पान विणून त्यात इडलीचं पीठ टाकून शिजवतात. ही इडली, फोडणी घातलेल्या घरच्या नारळाची चटणी आणि घरचं खोबरेल तेल टाकलं की मस्त लागायची. पण, हे सर्व वर्षातून दोन-तीन वेळाच.. कारण पैसे नव्हते. आई आणि बहिणीने घरीच लोणचं आणि पापड बनवायला सुरुवात केली. आई खूप चविष्ट कैरीचं लोणचं बनवायची. पापड पण. आम्ही हे सर्व बाजारातील 'नूतन स्टोअर' नावाच्या दुकानात विकायला द्यायचो. दुकानदाराने पैसे दिले की मला नवीन ड्रेस मिळायचा. माझ्याकडे फक्त दोनच ड्रेस होते. एक शाळेत वापरायचा आणि एक घरी घालायला. घरचे सर्व खर्च ताई सांभाळायची.

आमच्या कुंदापूरमध्ये बालाजीचं जुनं आणि सुंदर मंदिर आहे. आम्ही त्याला 'पेठे वेंकटरमण देवस्थान' म्हणायचो. दरवर्षी एप्रिलमधे रामनवमीच्या दिवशी जत्रा भरायची. पंचमीला सुरुवात व्हायची ते दशमीपर्यंत. रामनवमीला आजूबाजूच्या गावातून पुष्कळ लोकं यायची खुप गर्दी असायची. रोज दोन वाजेपर्यंत पंगतीत गांव जेवण असायचं. रोज रथयात्रा असायची. उत्सव मूर्ती रथात बसवून- रथ सजवून रोज संध्याकाळी मिरवणूक असायची. रामनवमीला जेवण वाढेपर्यंत सहा वाजयचे. मोठमोठ्या कढईत जेवण बनायचे. फणसाची भाजी अननसाची भाजी, सुरण, लाल भोपळा, गरम गरम डाळ, सांबार  आणि भात, दहा प्रकारचे गोड पदार्थ केळीच्या पानावर  असायचं. जेवण झाल्यानंतर जवळपास २ तास हाताला जेवणाचा सुगंध असतो. मंदिराच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तंबूंमधे वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने असायची. त्यात मिठाईची दुकानं खूप असायची त्यांची मांडणी सुंदर. सर्व गोड पदार्थ— म्हैसूरपाक, जिलेबी, हलवा, बत्ताशे, खाजा, खजूर, अन् बरंच काहीे. सर्वजण चांगला व्यापार करायचे पुष्कळ कमवायचेसुद्धा. त्यांचा व्यवसायच होता. ते गावा-गावातून फिरायचे. जिकडे जत्रा असेल तिकडे ते जायचे.

मी चौथीत होतो त्यावेळेस जत्रेला सुरुवात झाली होती. मी जत्रेत पोचलो. एकटाच होतो, माझं लक्ष खेळण्यांच्या दुकानांकडे. एका खेळण्याच्या दुकानात 'बॉम्बे टू गोवा' खेळणं होतं. एका बाजूला पाणी भरलेला रबराचा चेंडू आणि त्याला इलॅस्टिकची दोरी. त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला एक लूप होतं, ते मधल्या बोटाला लावायचं.. मग कोणालाही चेंडू फेकून मारायचा. इलॅस्टिक असल्यामुळे तो चेंडू हातात परत यायचा. तेव्हा त्याची किंमत १० पैसे होती. पण माझ्याकडे पैसे नव्हते. पण मला ते पाहिजेचं होतं. आता पैसे कसे जमवायचे? ताईने दोन पैसे दिले होते. माझ्या वडिलांचे एक मित्र होते. जत्रेच्या वेळी त्यांच्या सायकलच्या मागे धावलो तर ते पाच पैसे द्यायचे. बरेच दिवस ते दिसले नव्हते. रामनवमीच्या आदल्या दिवशी ते दिसले. मग काय.. लगेच त्यांच्या सायकलच्या मागे धावलो त्यांनी सायकल थांबवली आणि जत्रेचा खर्च म्हणून नेहमीप्रमाणे पाच पैसे दिले. मी खुष झालो. आता तीन पैसे कमी पडत होते. संध्याकाळी काकांकडे गेलो.. काकांचं घर मोठं होतं. 'वाडा' म्हणायला हरकत नाही. कुंदापूरचा मुख्य रस्ता होता.. खूप रहदारीचा रस्ता.. बाजूला वाडा, तिकडे आजी असायची.. वडिलांची आई, ती जत्रेसाठी काहीतरी द्यायची. तिने मला बघितलं.. जवळ घेतलं.. इतके दिवस कुठे होतास मस्ती कमी झाली की नाही.. मुख्य रस्त्यावर सायकल चालवायची नाही, असे खूप उपदेश दिले, मी गुपचूप ऐकून घेतलं प्रत्येक प्रश्नाला मान डोलावली.. मी मस्ती करतच नाही असं समजावून सांगितलं. माझं लक्ष आजी कधी आत जाते आणि माझ्यासाठी काय आणते तिकडे होतं. मला समजावून सांगितल्यावर आजी आत गेली आणि तिने चक्क पाच पैसे दिले आणि थोडी मिठाईपण— खजूर बत्ताशे, लाडू आणि हलवा.  माझ्याकडे आता बारा पैसे जमा झाले होते. १० पैशाचं 'बॉम्बे टू गोवा' आणि २ पैसे उद्यासाठी आईसक्रीम. तेव्हा मात्र मला फक्त 'बॉम्बे टू गोवा' दिसत होतं. आजीने दिलेला खाऊ घरी ठेवला आणि थेट जत्रा गाठली. त्या दुकानदाराकडून 'बॉम्बे टू गोवा' घेतलं आणि मित्रांसोबत खेळायला निघालो.. सर्व मित्रांना मारत सुटलो.. खूप गम्मत वाटली मित्रांनी विचारलं कुठून घेतलं? सर्व मित्रांना घेऊन जत्रेत गेलो. मी जिथून घेतलं होतं ते दुकान दाखवलं आणि एक मित्राला चेंडू मारला तो जाऊन नेमका एका आजोबांना लागला.. त्यांना दुखलं असेल. ते ओरडले, त्यांनी ते खेचून घेतलं.. इलॅस्टिक तुटलं.. चेंडू फुटला.. त्यातलं पाणी बाहेर आलं. तसंच माझ्या डोळ्यातूनसुद्धा.. ढसा ढसा रडलो. मित्रांना तिथेच सोडलं आणि गुपचूप घरी गेलो, थोड्यावेळाने परत देवळात आलो आणि आईबरोबर जेवायला बसलो.

12 comments:

  1. फारच छान लिहिता तुम्ही पै काका
    शब्द चित्र

    ReplyDelete
  2. सुंदर .. बालपणीचा सुखाचा काळ शब्दश: उभा केलात ♥️

    ReplyDelete
  3. सुंदर लिहितात पै.मुळात गावाकडील निसर्ग सुंदर आणि तुमचे बालपण तिकडे गेले अनुभव छान अगदी डोळ्यासमोर उभे केले. जत्रेचे वर्णन छान . वेळ आहे लिहित रहा सुप्त गुण बाहेर आला

    ReplyDelete