Tuesday, March 31, 2020

माझ्या आयुष्यातील पहिलं एप्रिल फूल आणि कुंदापूरचं Fun Fair!!!!

आमच्याकडे इयत्ता पाचवीपासून इंग्रजीला सुरुवात होते. बाकी सर्व विषयांत मला चांगले गुण मिळायचे. पण इंग्रजी आणि माझा छत्तीसचा आकडा होता. इंग्रजी मला कधी जमलेच नाही. सलग तीन वर्षे दहावी, अकरावी, बारावीत इंग्रजीत मला पस्तीस गुण मिळालेत!! बाकीच्या विषयात चांगले गुण मिळाल्यामुळे कदाचित मला इंग्रजीत पास केलं असेल. पाचवीत असताना मी रोज सकाळी दूध आणायला आमच्या मावशीकडे जायचो. ती माझ्या आजीची बहीण. पण तिला आम्ही मावशी म्हणायचो तिचं नाव होतं 'रमा'. आम्ही तिला 'रमपाची' म्हणायचो कोंकणीत पाची म्हणजे मावशी. तिचा मुलगा मुंबईत असल्यामुळे ते श्रीमंत होते. त्यांच्याकडे दर आठवड्याला दोन मासिकं यायची 'सुधा' आणि 'प्रजामत'. माझी वाचनाची सुरुवात इकडून झाली. या मासिकांत काही कॉमिक्सची पान असायची. फँटम, शूजा, दारा वगैरे मला खूप आवडायचे. ही मासिकं फक्त गुरुवारी यायची म्हणून दर गुरुवारी न विसरता ही मासिकं वाचायचो.

एकदा, एक एप्रिल रोजी मी नेहमीप्रमाणे दूध आणायला मावशीच्या घरी गेलो. तिकडे ताई होती तिच्या हातात दुधाची किटली दिली आणि मी मासिकं वाचत बसलो. त्यातच रमून गेलो. थोड्या वेळात दुधाची किटली ताईने आणून दिली. किटली घेतली आणि मी घरी निघालो पाच मिनिटांत घरी पोचलो. दुधाची किटली आईकडे दिली आणि मी बाहेर आलो थोड्यावेळात ताई किटली घेऊन बाहेर आली आणि ओरडली कुठे गेलेलास काय आणलं तू यात दूध नाहीये.. मी म्हटलं त्यांनी दिलं मी आणलं, मला काय माहीत. अरे.. यात दूध नाही; पाण्यात चुना टाकून पांढरं करून दिलंय. मी तसाच किटली घेऊन मावशीकडे गेलो सर्व मला बघून हसत होते. मला रडायला येत होतं. मावशीने मला जवळ घेतलं आणि सर्वांना ओरडली. मग सर्व बोलले अरे पुंडा आज तारीख काय आहे मग माझ्या लक्षात आलं की आज एक एप्रिल आहे. पहिल्यांदा मी  एप्रिलफूल झालो. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी मी कोणाला तरी एप्रिलफूल करतोच.

मी लहान असताना कुंदापूर मध्ये मनोरंजनाचे बरेचसे कार्यक्रम व्हायचे मंदिरात ऑर्केस्ट्रा, नाटक, कीर्तन, पपेट शो, बाहेर शेतात यक्षगान, हे रात्री सुरू होऊन सकाळपर्यंत चालाायचं. मी पण जायचो, आम्ही सर्वजण चणे-फुटाणे आणि शेंगदाणे घेऊन जायचो. माझं ते सर्व बघण्यापेक्षा खाण्यामध्येच जास्त लक्ष असायचं. ते संपलं की मी झोपून जायचो. नंतर सकाळी उठून परत घरी.


कुंदपूरला बोर्ड स्कूल आहे तिकडे माझे दोघे भाऊ शिकत होते. तिकडे दरवर्षी डिसेंबर महिन्यात फन फेअर असायचं. मी सहावीला होतो. मला कळलं की फन फेअर भरणार आहे. मी ठरवलं यावर्षी जायचं. शाळा लांब होती एवढं लांब मी एकटा खूप कमी वेळा गेलो होतो. पण बरोबर कोणीतरी असायचं. दोन दिवस आधीपासून मी तयारी केली पैसे जमावयाची. माझ्याकडे पाच पैसे होते, ताईकडून पाच पैसे घेतले आजीकडून दहा पैसे मिळाले, वीस पैसे जमा झाले. रविवार होता. सकाळी दहा वाजता फन फेअर सुरू होणार होतं. त्यादिवशी मी सकाळी लवकर उठलो नाहीतर रविवारी मी आरामात उठायचो. सकाळी आठला उठलो. अांघोळ केली तसं ताई विचारायला लागली लवकर का उठलास कुठे जाणार? मी बोललो देवळात जातो मित्रांसोबत. जर मी फन फेअर सांगितलं असतं तर मला एकट्याला सोडलं नसतं. भावाबरोबर पाठवल असतं, मी अडकलो असतो. ताई बोलली ठीक आहे जा पण मस्ती करू नकोस. तुझी तक्रार नाही यायला पाहिजे. मी बोललो मस्ती करणार नाही. माझ्याकडे दोनच ड्रेस होते. मी त्यातला त्यात चांगला ड्रेस निवडला आणि तो ड्रेस घातला, केस विंचरले. आधी मी केसांना डाव्या बाजूला भांग पाडायचो. ताईला सांगितलं निघतो म्हणून आणि बाहेर पडलो. पहिल्यांदाच एकटा बाहेर जात होतो. कोणीही मित्र माझ्या बरोबर नव्हते. ती शाळा घरापासून लांब होती मी जाम खुश होतो, एक पाय पुढे आणि एक पाय मागे उड्या मारत सुटलो. शाळेच्या दारावर पोचलो. मस्त कमान केली होती. वरती सुस्वागतम लिहीलं होतं. त्याच्या खाली मोठ्या अक्षरांनी इंग्रजीत Fun Fair लिहीलं होतं. आत गेलो... सुंदर वातावरण होतं.. शहनाईचा मधुर आवाज.. लोकं यायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला खाण्या-पिण्याचे म्हणजे आईस कँडी, चणे शेंगदाणे, उकडलेल्या शेंगा, मसाला चुरमुरे म्हणजे भडंगमधे कांदा, तेल, तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून कागदात गुंडाळून देतात अशा वेगवेगळ्या गाड्या होत्या. पुढे, वेगवेगळ्या गेम्सचे स्टॉल्स होते. एका स्टॉलमधे काही वस्तू खाली मांडलेल्या होत्या आणि एक माणूस रिंग घेऊन उभा होता. खेळणाऱ्याने ती रिंग जर त्या वस्तूवर बरोबर टाकली तर ती वस्तू त्याची. पुढे, एकाने फुगे लावले होते. बंदुकीने ते फुगे फोडायचे. एकाने पाण्याने भरलेले गोल आकाराचा टब ठेवला होता. त्यात लाकडी बदक तरंगत होती. त्या बदकाच्या गळ्यात रिंग अडकवायची. रिंग अडकली तर त्याला बक्षीस. पुढे, एकाने एक बाटली आडवी ठेवली होती त्याच्या टोकाला एक खडूचा तुकडा ठेवला होता. तोंडाने फूंकर मारुन तो खडू बाटलीत गेला पाहिजे असा तो खेळ होता. मी बराच वेळ तिकडे उभा राहिलो पण कोणीही खडू बाटलीमधे टाकू शकले नाही. पुढच्या स्टॉलवर, एकाने मागे एका टेबलवर डालडाचे डबे रचून ठेवले होते. खाली पाच त्यावर चार नंतर तीन, दोन, एक आणि एक टेबल समोर ठेवलं होतं.. दोन्ही टेबलमध्ये अंतर होतं. मग तो प्रत्येकाला  पिवळ्या रंगाचे टेनिसचे तीन चेंडू द्यायचा आणि दहा पैसे घ्यायचा. जर तीन चेंडूमध्ये ते सर्व पंधरा डब्बे पाडले की त्याला पन्नास पैसे बक्षीस होतं. टेबल मोठं होतं. सर्व डबे पाडणं कठीण होतं.. सर्व प्रयत्न करत होते मी थोडावेळ थांबलो नीट बघितलं. विचार केला आपण प्रयत्न करू. खिशातले पाच पैशाचे दोन नाणी काढली आणि त्या स्टॉलवाल्याला दिले. तो बोलला.. तुला जमेल का? मी लहान होतो पण नेमबाजीत पटाईत होतो. तीन चेंडू घेतले. पहिला चेंडू नेम धरून मारला आणि पंधरा पैकी नऊ डबे पडले. सर्व माझ्याकडे बघायला लागले. दुसरा चेंडू नेम धरून मारला, चार डबे पडले. आता दोन डबे राहिले होते. एक उभा होता आणि एक आडवा. सर्व माझ्याकडे बघायला लागले.. आता काय होईल. एक चेंडू दोन डबे, ते पण एक उभा आणि एक आडवा. फक्त ते जवळ-जवळ होते. मी नेम धरून तिसरा चेंडू फेकला तसं सर्वांनी टाळ्या वाजवल्या. फक्त उभा होता तो डबा पडला आणि एक डबा राहिला. सर्वांनी कौतुक केलं माझं. एवढा लहान असून चांगला प्रयत्न केला होता मी. मला थोडसं रडायला येत होतं माझे दहा पैसे गेले होते. आता खिशात दहा पैसे होते. त्याची आईसकँडी घेतली खात खात घरी परतलो डोळ्यासमोर तो राहिलेला डबा आणि चेंडू दिसत होता.

Sunday, March 29, 2020

माझे मित्र आणि पेंटर ज्यांनी मला धडा शिकवला!!!

माझी चार मुलांची गँग होती. मी मिळून आम्ही पाच. अच्युत, खाजा, रवी, चौथ्याच नाव नीट आठवत नाही.

पहिला अच्युत नायक, घराच्या बाजूला आमचे नातेवाईक पुरुषोत्तम पै, यांच्या मुलीचा मुलगा. त्याचे वडील वारल्यामुळे ते आजोबांकडे राहायचे, ते जाम कडक होते आम्ही घाबरायचो त्यांना. त्यांचा मुलगा वेंकटेश— अच्युतचे मामा, त्यांचं हॉटेल होतं 'कोर्ट रेस्टॉरंट' ते कोर्टाच्याजवळ होतं कोर्टामधे येणारे जाणारे सर्व त्यांचे गिऱ्हाईक होते त्यामुळे ते श्रीमंत होते. आमच्याकडे सकाळी पेज असायची ते पण उकडा तांदळाची, कधी कधी सकाळच्या नाश्त्याला मी त्यांच्याकडे जायचो.

दुसरा मित्र खाजा. हा माझा खास मित्र. त्याचं घर आणि माझ्या घराच्यामधे एक घर होतं. ते पण मुस्लिम होते. खाजाच्या वडिलांची पानाची गादी होती. आम्ही त्याला बीडा अंगडी म्हणायचो. अंगडी म्हणजे दुकान. तिकडून आम्ही काही समान आणायचो. त्यांच्याकडे पान, सुपारी, चिक्की, केळं, माचीस गूळ वगैरे. तेव्हा आमच्याकडे वेगळा गूळ मिळायचा आतासारखा नाही. सुकलेल्या केळीच्या पानांचे लांब तुकडे करून खाली आणि वर दोरीने बांधून त्याला गोल आकार द्यायचे आणि त्यात चपटे गोलाकाराचे वीस गुळाचे तुकडे असायचे. ते एक दोन तुकडे विकायचे. आम्ही गूळ खीरसाठी आणि कॉफीसाठी वापरायचो त्याचा रंग काळा असायचा. आम्ही राहायचो त्या रस्त्याचं नाव मधूगुड्डे रोड आणि पुढे एक किलोमीटरवर समुद्र असल्या कारणामुळे मच्छी पकडणारे आणि शेती काम करणारे आमच्या घरासमोरून जायचे. ते पाणी मागायचे, आमची आई एक तांब्यात पाणी आणि त्या गुळाचा तुकडा घ्यायची. ती म्हणायची उन्हात फिरून तहान लागलेल्यांना पाण्याबरोबर काही तरी गोड द्यायला हवं, आम्ही गूळ घ्यायचो. जो खाजाच्या वडिलांच्या दुकानात मिळायचा.

तिसरा रवी. ह्याचा खोबरेल तेल काढायचा चरखा म्हणजे घाणा होता. कोणी खोबरं आणून दिलं की ते त्या घाण्यामध्ये टाकायचे त्याला चाकं होती, त्याला गाय बांधलेली असायची ती गाय पुढे गेली की ते चक्र फिरायचं मग खोबरेल तेल यायचं ते बघायला खूप गम्मत वाटायची. तेल काढल्यानंतर ते सुकं खोबरं चिक्कीसारखं बनायचं ते आम्हाला खायला मिळायचं.

चौथ्याचं नाव मी विसरलो. त्याचे वडील सुताराचे काम करायचे आणि नवरात्रीला आमच्या कुंदापूरमध्ये एक स्पर्धा असायची नऊ दिवस वेगवेगळ्या वेशभूषेत काही लोक घराघरांमधे हिंडायचे. चांगली वेशभूषा आणि अभिनयाला बक्षीस मिळायचं.  श्रीराम, श्री शंकर, नारदमुनी,श्री हनुमान असे वेगवेगळ्या पोशाखात लोकं यायचे. माझ्या मित्राच्या वडिलांनी नारदाचा वेश घातलेला. त्यांना तिसरं बक्षीस मिळालं होतं. या सर्वांत मीच मोठा होतो वयाने पण आणि उंचीला पण. मी जेव्हा बाहेर पडायचो तेव्हा हे चारही मित्र माझ्याबरोबर असायचे. मला एकट्याला झाडावर चढता येत होतं. मी त्यांना कैरी, चिकू, पेरू तोडून द्यायचो. आमच्या सर्वांच्या हातात काठी असायची माझी काठी मोठी असायची. जर कोणी मोठी काठी आणली की मी तोडायचो.. माझी दादागिरी.. ते छोटे बिचारे.. गुपचूप माझ्यामागे असायचे.

माज्या शाळेचं नाव गर्ल स्कूल,शाळेचं नावं गर्ल स्कूल असलं मुली आणि मुले दोन्ही शिकायचे  या शाळेत. आमच्याकडे दोन वेळेची शाळा होती सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी एक ते चार. दुपारी बाराला शाळा सुटायची शाळा जवळ असल्यामुळे दुपारी जेवायला घरी. जेवून परत शाळेत. सकाळी आठ चाळीस पर्यंत घरून निघायचो. शाळा खूप जवळ होती. आमचा मधूगुड्डे रोड ओलांडला की देवळाचा मागचा रस्ता, तिकडून एक जवळचा रस्ता होता. ती छोटीसी वाट होती. दोन्ही बाजूला घरं, दोन्ही घराचे कुंपण झाडांनी आणि मातीने बांधलेलं होतं. खाली वाळू अामच्याकडची वाळू पांढरी शुभ्र. कुठेही कचरा नाही, पाणी नाही, स्वच्छ. मोठमोठी झाडं. एक चिंचेच झाड होत मी दगड मारायचो चिंच पडलं की सर्वाना खायला मिळायची.
 मी पाचवीत होतो त्यावेळेस एकेदिवशी नेहमी प्रमाणे आम्ही दुपारी जेवण उरकून शाळेला निघालो देवळाच्या मागच्या गल्लीत पोचलो. कोपऱ्यावर एक इलेक्ट्रीकचा खांब होता. त्याच्यावर एक माणूस ब्रशने  सिल्व्हर कलर मारत होता त्याचे कपडे फाटले होते डोक्याला रुमाल बांधला होता. चेहऱ्यावर आणि अंगावर सिल्व्हर कलर लागलेला होता तरी तो आपलं काम करत होता. आम्ही त्या खांबाजवळ गेलो आणि मी त्याला बघून हसलो तसे सर्व मित्र हसायला लागले. आम्ही त्याला त्याच्या कपड्यांवरून आणि चेहऱ्याच्या रंगावरून चिडवायला लागलो. त्यानी खाली बघितलं. मी परत त्याला चिडवायला लागलो. तुझा चेहरा बघ, तुझा ड्रेस बघ, वगैरे. मला वाटलं तो खाली येऊ शकत नाही. उंचीवर होता तो, आणि मी पळ काढण्यात पटाईत  होतो. तरीपण तो खाली उतरला आणि मला पकडलं. माझ्यामुळे बाकीचे पण अडकले. माझ्याकडे अजून एक मोठं अस्त्र होतं.. ते म्हणजे ढसा ढसा रडायचं.. त्यानी सोडलं की पळून जायचं. आम्हाला वाटलं की तो मारेल आणि ओरडेल, आम्ही इतकं चिडवल्यानंतर तो आम्हाला सोडणार नाही. त्यांनी असं काहीच केलं नाही. त्यांनी त्याच्या पॅन्टच्या खिशातून पाच जरीच्या पेपरमध्ये बांधलेली चॉकलेटं दिली. आम्ही त्याला कचपाचो म्हणायचो. पांढऱ्या रंगाचं चवीला पेपरमिंट सारखं असतं ते दिलं आणि त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. सर्वांच नाव विचारलं, कितवीत शिकता? वगैरे. आम्ही आमचं नाव सांगितले, कितवीत शिकतो ते पण सांगितलं. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. तो बोलला माझे आई वडील गरीब होते. त्यामुळे मला शिक्षण नाही मिळालं. शिक्षण नसल्याने आणि गरीबीमुळे मला हे काम करायला लागतंय पण मी माझं काम आवडीने करतोय ह्या कामामुळेच माझं घर चालतं. माझी पण तुमच्या एवढी मुलं आहेत. ते शाळेत जातात या कामामुळेच. कुठलं ही काम कमी पणाचं नसतं. तुम्ही लहान आहात शाळेत जाऊन शिकून मोठं व्हायचं. चांगली नोकरी करायची. म्हणजे माझ्यासारखी परिस्थिती निर्माण नाही होणार. मग त्यांनी माझा हात सोडला. मी लक्ष देऊन ऐकत होतो. मला काहीच समजलं नव्हतं. त्यांनी माझा हात सोडला. लगेच सर्व मित्रांना घेऊन पळत सुटलो. मग बरेच दिवस त्या वाटेवरुन जायचं बंद केलं. आजही तो माणूस माझ्या डोळ्यासमोर येतो. त्याचे ते कपडे त्याच्या चेहरा, हा माणूस मला बरेच काही शिकवून गेला. आतापर्यंत बऱ्याच लोकांना ही गोष्ट मी सांगितली आहे.


Friday, March 27, 2020

कुंदापूरची जत्रा आणि बॉम्बे टू गोवा

माझं नाव पुंडलिक असलं तरी माझ्या घरी मला 'पुंडा' नावाने हाक मारतात. त्यामुळे माझ्या जवळचे सर्व मित्र मला 'पुंडा'च म्हणतात. बाकी काही लोकं पुंडलिक, पुंडलिका म्हणतात असो. आमचं आडनाव पै, असं एकेरी आडनाव खूप कमी लोकांचं आहे, पण या आडनावामुळे खूपजण चिडवतात. जसं 'पै फॉर पैसा', कन्नडमध्ये पै गुद्धी पावणे म्हणजे 'पै पै किती जमवले', वगैरे.

आम्ही पै, म्हणजे GSB गौड सारस्वत ब्राह्मण. पण मी मस्करीत गरीब सारस्वत ब्राह्मण म्हणत असतो!! तसं आम्ही गरीबीतूनच दिवस काढले. वडील होते तोपर्यंत ठीक होतं, वडील मी पहिलीत असतानाच वारले, मोठे भाऊ ज्यांना आम्ही आण्णा म्हणतो ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले.  सुरुवातीला हॉटेलमध्ये कामाला लागले. महिन्यातून मिळालेल्या पगारातून १० रुपये मनी ऑर्डरने आम्हाला पाठवायचे, या पैशातून २० किलो तांदूळ आणायचो. त्याकाळात तांदूळ गवताच्या गोलाकार वस्तूमध्ये यायचे. आम्ही त्याला 'मुठो' म्हणायचो. तेवढा तांदूळ एक महिना पुरायचा. सकाळची पेज असायची त्याच्याबरोबर घरचं लोणचं, दुपारी जेवण. घरचाच नारळ असल्यामुळे आणि भाजी लोकं आणून द्यायचे किंवा रविवारच्या बाजारातून त्यामुळे पोट भरून जेवण. आमची आई जेवण खूप चांगलं बनवायची. आताच्या जेवणाला तेवढी चव नाही. कदाचित भुकेमुळे असू शकेल. दिवसभर मस्ती करून थकून जायचो आणि चॉईस नव्हता. फक्त सणासुदीला वेगवेगळे पक्वान्न असायचे. फणसाचे पान विणून त्यात इडलीचं पीठ टाकून शिजवतात. ही इडली, फोडणी घातलेल्या घरच्या नारळाची चटणी आणि घरचं खोबरेल तेल टाकलं की मस्त लागायची. पण, हे सर्व वर्षातून दोन-तीन वेळाच.. कारण पैसे नव्हते. आई आणि बहिणीने घरीच लोणचं आणि पापड बनवायला सुरुवात केली. आई खूप चविष्ट कैरीचं लोणचं बनवायची. पापड पण. आम्ही हे सर्व बाजारातील 'नूतन स्टोअर' नावाच्या दुकानात विकायला द्यायचो. दुकानदाराने पैसे दिले की मला नवीन ड्रेस मिळायचा. माझ्याकडे फक्त दोनच ड्रेस होते. एक शाळेत वापरायचा आणि एक घरी घालायला. घरचे सर्व खर्च ताई सांभाळायची.

आमच्या कुंदापूरमध्ये बालाजीचं जुनं आणि सुंदर मंदिर आहे. आम्ही त्याला 'पेठे वेंकटरमण देवस्थान' म्हणायचो. दरवर्षी एप्रिलमधे रामनवमीच्या दिवशी जत्रा भरायची. पंचमीला सुरुवात व्हायची ते दशमीपर्यंत. रामनवमीला आजूबाजूच्या गावातून पुष्कळ लोकं यायची खुप गर्दी असायची. रोज दोन वाजेपर्यंत पंगतीत गांव जेवण असायचं. रोज रथयात्रा असायची. उत्सव मूर्ती रथात बसवून- रथ सजवून रोज संध्याकाळी मिरवणूक असायची. रामनवमीला जेवण वाढेपर्यंत सहा वाजयचे. मोठमोठ्या कढईत जेवण बनायचे. फणसाची भाजी अननसाची भाजी, सुरण, लाल भोपळा, गरम गरम डाळ, सांबार  आणि भात, दहा प्रकारचे गोड पदार्थ केळीच्या पानावर  असायचं. जेवण झाल्यानंतर जवळपास २ तास हाताला जेवणाचा सुगंध असतो. मंदिराच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तंबूंमधे वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने असायची. त्यात मिठाईची दुकानं खूप असायची त्यांची मांडणी सुंदर. सर्व गोड पदार्थ— म्हैसूरपाक, जिलेबी, हलवा, बत्ताशे, खाजा, खजूर, अन् बरंच काहीे. सर्वजण चांगला व्यापार करायचे पुष्कळ कमवायचेसुद्धा. त्यांचा व्यवसायच होता. ते गावा-गावातून फिरायचे. जिकडे जत्रा असेल तिकडे ते जायचे.

मी चौथीत होतो त्यावेळेस जत्रेला सुरुवात झाली होती. मी जत्रेत पोचलो. एकटाच होतो, माझं लक्ष खेळण्यांच्या दुकानांकडे. एका खेळण्याच्या दुकानात 'बॉम्बे टू गोवा' खेळणं होतं. एका बाजूला पाणी भरलेला रबराचा चेंडू आणि त्याला इलॅस्टिकची दोरी. त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला एक लूप होतं, ते मधल्या बोटाला लावायचं.. मग कोणालाही चेंडू फेकून मारायचा. इलॅस्टिक असल्यामुळे तो चेंडू हातात परत यायचा. तेव्हा त्याची किंमत १० पैसे होती. पण माझ्याकडे पैसे नव्हते. पण मला ते पाहिजेचं होतं. आता पैसे कसे जमवायचे? ताईने दोन पैसे दिले होते. माझ्या वडिलांचे एक मित्र होते. जत्रेच्या वेळी त्यांच्या सायकलच्या मागे धावलो तर ते पाच पैसे द्यायचे. बरेच दिवस ते दिसले नव्हते. रामनवमीच्या आदल्या दिवशी ते दिसले. मग काय.. लगेच त्यांच्या सायकलच्या मागे धावलो त्यांनी सायकल थांबवली आणि जत्रेचा खर्च म्हणून नेहमीप्रमाणे पाच पैसे दिले. मी खुष झालो. आता तीन पैसे कमी पडत होते. संध्याकाळी काकांकडे गेलो.. काकांचं घर मोठं होतं. 'वाडा' म्हणायला हरकत नाही. कुंदापूरचा मुख्य रस्ता होता.. खूप रहदारीचा रस्ता.. बाजूला वाडा, तिकडे आजी असायची.. वडिलांची आई, ती जत्रेसाठी काहीतरी द्यायची. तिने मला बघितलं.. जवळ घेतलं.. इतके दिवस कुठे होतास मस्ती कमी झाली की नाही.. मुख्य रस्त्यावर सायकल चालवायची नाही, असे खूप उपदेश दिले, मी गुपचूप ऐकून घेतलं प्रत्येक प्रश्नाला मान डोलावली.. मी मस्ती करतच नाही असं समजावून सांगितलं. माझं लक्ष आजी कधी आत जाते आणि माझ्यासाठी काय आणते तिकडे होतं. मला समजावून सांगितल्यावर आजी आत गेली आणि तिने चक्क पाच पैसे दिले आणि थोडी मिठाईपण— खजूर बत्ताशे, लाडू आणि हलवा.  माझ्याकडे आता बारा पैसे जमा झाले होते. १० पैशाचं 'बॉम्बे टू गोवा' आणि २ पैसे उद्यासाठी आईसक्रीम. तेव्हा मात्र मला फक्त 'बॉम्बे टू गोवा' दिसत होतं. आजीने दिलेला खाऊ घरी ठेवला आणि थेट जत्रा गाठली. त्या दुकानदाराकडून 'बॉम्बे टू गोवा' घेतलं आणि मित्रांसोबत खेळायला निघालो.. सर्व मित्रांना मारत सुटलो.. खूप गम्मत वाटली मित्रांनी विचारलं कुठून घेतलं? सर्व मित्रांना घेऊन जत्रेत गेलो. मी जिथून घेतलं होतं ते दुकान दाखवलं आणि एक मित्राला चेंडू मारला तो जाऊन नेमका एका आजोबांना लागला.. त्यांना दुखलं असेल. ते ओरडले, त्यांनी ते खेचून घेतलं.. इलॅस्टिक तुटलं.. चेंडू फुटला.. त्यातलं पाणी बाहेर आलं. तसंच माझ्या डोळ्यातूनसुद्धा.. ढसा ढसा रडलो. मित्रांना तिथेच सोडलं आणि गुपचूप घरी गेलो, थोड्यावेळाने परत देवळात आलो आणि आईबरोबर जेवायला बसलो.

माझे बालपण


माझा जन्म कर्नाटकातील उडुपी जवळच्या कुंदापूर इथे झाला. कुंदापूर खूप सुंदर गाव. लाल माती, नारळाची झाडं, एक किलोमीटरवर अरबी समुद्र, ३ किलोमीटरवर गंगोळी नदी, प्रत्येक घरी एक कधीही न सुकणारी अशी विहीर, गावा-गावांना जोडणारी बस सेवा, ताजी मच्छी, दर रविवारी भरणारा बाजार.. असं आमचं कुंदापूर गाव.

मी खूप मस्तीखोर होतो. मला घरच्यांनी सांगितलेलं की जेव्हा जनगणना करणारे घरी आले होते, तेव्हा माझं नावं सांगितलं तर ते बोलले की ह्याच नाव पुंडलिक का ठेवलं? पुंडलिक म्हणजे पुंडा! या नावाचे सर्व मुलं खूप मस्तीखोर असतात दुसरं नाव सुचलं नाही का तुम्हाला?

मला ३ भाऊ आणि ३ बहिणी आणि मी शेवटचा... लाडका! पण, लहान असतानाच वडील वारले, मी जन्माला यायच्या आधीच मोठया बहिणीचं लग्न झालं. मी घरी त्रास देत असल्यामुळे मधली बहीण मला तिच्याबरोबर शाळेत घेऊन जायची. वर्ग सुरू असताना मी बेंच खाली लपून बसायचो, तिकडे पण मस्ती. मग तिने मला शाळेत पाठवायचं ठरवलं. मी ४ वर्षांचा होतो तेव्हा ताईने माझी जन्म तारिख १५ जुलै, १९६४ टाकली. खरा जन्म १५ सप्टेंबर, १९६५ चा. मी तसा खूप हुशार नव्हतो. पण पास होत होतो. पहिलीत असताना, मार्चमधे मला ताप आला म्हणून परीक्षा देऊ शकलो नाही पण मला पास करून दुसरीत पाठवलं. दुसरीत असताना पाटीवर माझं नाव लिहायला सरांनी सांगितलं तर मला आठवतंय की मी पुंडलिक ऐवजी 'क्लीडंपु' लिहिलं होतं!!! दुसरीला गेल्यानंतर घरातून बाहेर पडायला लागलो आणि खरी मस्तीला सुरुवात झाली.

आमचं घर तसं लहान होतं, घरात मी, माझी आई, दोन बहिणी, दोन भाऊ. मोठा भाऊ कामासाठी मुंबईला आला होता. आमच्या अंगणात ३ नारळाची झाडं, एक फणसाचं झाड आणि एक छोटासा फुलांचा बगीचा होता.

तिसरीत असतानाच मी झाडांवर चढायला शिकलो होतो. जवळच आजीचं घर होतं. शनिवारी देवळात पूजा करण्यासाठी नारळ लागायचं. नारायण म्हणून एक माणूस आम्हाला नारळाच्या झाडावर चढून नारळ काढून द्यायचा. जर तो आला नाही तर आजी मला बोलवायची. एरवी मी झाडावर चढलो की माझी तक्रार ताईकडे किंवा आईकडे. मग ताई मला मारायची तसं आईने मला कधीच मारलं नाही, किंवा कधी ओरडली पण नाही, खूप काळजी घ्यायची माझी.

जून महिन्यात आमच्या घरच्या फणसाच्या झाडाला खूप फणस असायचे. तेव्हा, नारायणला आम्ही बोलवायचो आणि तो सर्व फणसं काढून द्यायचा. मला आठवतंय, मी चौथीत होतो तेव्हा, परीक्षा संपून रिझल्टसुद्धा आले होते. मी पास झालो होतो. मे महिन्यात दरवर्षी प्रमाणे त्या फणसाच्या झाडाला जवळ जवळ २० फणस लागले होते, पिकायला पण आले होते. नारायणला फणस काढायला बोलवले. त्यांनी सर्व फणस काढले पण एक फणस सोडला, ती फांदी बारीक आणि लांब होती, माझं लक्ष त्या फणसावर होतं. दोन-तीन दिवस असेच गेले. आमच्याकडे दुपारी दोन ते चार पर्यंत सर्व झोपायचे. पण मी उनाडक्या करत फिरायचो माझ्या गँगबरोबर. ४ जणांची गँग होती माझी, सर्व मुस्लिम मुलं होती.

एक दिवस मी घरीच थांबलो सर्वजण झोपायची वाट बघितली आणि हळूच त्या झाडावर चढलो पुढे सरकत सरकत ती फांदी गाठली मला अजिबात भीती नव्हती की पडलो तर वगैरे, कसा तरी करून त्या फणसापर्यंत पोचलो... तो मला खाली टाकायचा नव्हता, आवाज आला असता आणि सर्व जागे झाले असते म्हणून मी एक हाताने त्या फणसाला पीळ दिला, फणस छोटा होता म्हणून हळूच दाताने तो फणस चावून धरला आणि खाली उतरायला लागलो. एक मिनिटात मी उतरलो असतो, पण तेवढ्यात माझ्या भावाने मला बघितलं!! फणस तोंडात घट्ट धरून दोन्ही हाताने सरपटत उतरत असताना मी त्याला गप्प राहाण्याचा इशारा केला, पण त्याने ऐकलं नाही आणि ओरडून सर्वांना गोळा केलं. आई, ताई, आजूबाजूचे सर्व लोकं गोळा झाले. सर्वच ओरडत होते. पडला असता तर हात पाय मोडले असते तर कोण जबाबदार! सोडू नका त्याला.. बांधून ठेवा दुपारचं वगैरे.. खाली उतरताच ताईने माझे कान पकडले आणि फणस काढून घेतला. मी रडत होतो. परत नाही चढणार, ताई एक ऐकत नव्हती.. ओरडली.. पडला असतास तर.. काही झालं असतं तर. बाजूच्या खोलीत घेऊन गेली, तिकडे सर्व फणस ठेवले होते. माझे दोन्ही हात बांधले, पायाला पण दोरीने बांधले आणि बेदम मारलं मला. यापुढे असं काही केलं तर घराबाहेर काढीन.. खूप ओरडली. मी रडत होतो. त्यादिवशी मला शिक्षा म्हणून काहीच खायला नाही दिलं. खोलीत ठेवलेल्या फणसांकडे बघत होतो. त्यादिवशी ठरवलं परत फणसाच्या झाडावर चढायचं नाही. नंतर समजलं की ताई पण त्यादिवशी जेवली नव्हती शेवटी लाडका होतो ना.